Sunday, August 28, 2011

नको जाऊस कृष्णा...


हात जोडून अन्‌ पाय धरुन
विनवणी करतायत गोपी रडून
वेड आमच्या जिवाला लावून
नको जाऊस कृष्णा आम्हाला सोडून

नको करुस निवड कुणा एकीची
आस संपेल इतरांच्या जगण्याची
खेळ प्रेमाचा अल्लड पोरींशी खेळून
नको जाऊस कृष्णा आम्हाला सोडून

नाही घाबरत बघ आम्ही समाजाला
ठेवलंय सांगून केव्हाच आई-बापाला
बायको नाही तर राहीन सखी बनून
नको जाऊस कृष्णा आम्हाला सोडून

मन तुला वाहिलं स्वतःच्या नकळत
शरीरानंही एकरुप झालो परत परत
रंग प्रणयाचे आमच्यावर रोज उधळून
नको जाऊस कृष्णा आम्हाला सोडून